नाशिक ऑक्सिजन गळती : तो हमारे अब्बू अभि जिंदा होतें! ‘त्या’ घटनेला एक वर्ष पूर्ण

नाशिक । प्रतिनिधी

कोरोना काळातील नाशिकमधील (Nashik) ‘ती’ घटना आजही आठवली तरी अंगावर काटा उभा राहतो. ऑक्सिजन प्लांटमध्ये (Oxygen Plant) ऑक्सिजन भरत असताना अचानक गळती झाल्याने २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा मृत्यूचा तांडव नाशिककरांनी याची देही याची डोळा अनुभवाला आणि संपूर्ण शहरात अश्रुंचे लोट पाहायला मिळाले होते.

आजपासून वर्षभरापूर्वी दि. २१ एप्रिल २०२१ रोजीची हि हृदय पिळवटून टाकणारी घटना. नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr. Zakir Hussain Hospital) घडली. वेळ दुपारी सव्वा बाराची होती. यावेळी ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक गळती झाल्याने त्यातून ऑक्सिजन (Oxygen Leak) बाहेर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे व्हेंटिलेटरवर (Ventilator) उपचार घेणार्‍या कोरोनाबाधितांना ऑक्सिजन (Corona Patients) मिळेनासा झाल्याने यात २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

नाशिकच्या मध्यवर्ती असणाऱ्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडलेल्या या घटनेस आज एक वर्ष पूर्ण झाले असून, आजही त्या घटनेचा विचार केल्यास २२ कुटुंबीयांसह नाशिककरांच्या मनात धस्स होत आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात असलेल्या १३ केएल क्षमतेची ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती लागली. त्यावेळी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५७ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३१ रुग्ण हे ऑक्सिजनवर, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते.

ऑक्सिजन गळती झाल्यानंतर रुग्णांनी व त्यांच्या नातलगांनी जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र, ऑक्सिजनअभावी त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेक नातलग रुग्णांना काही क्षणांपूर्वीच भेटून बोलून बाहेर गेले. परत आल्यानंतर त्यांचा रुग्ण निपचित पडलेला दिसला. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतानाच ही दुर्घटना घडल्याने देशभरात खळबळ उडाली होती.

घटनेतील एक प्रसंग
शहरातील सय्यद कुटुंबातील कर्ता पुरुष असणारे सांडूभाई सय्यद हे देखील या रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनाही ऑक्सिजनची गरज होती. त्या दिवशी सय्यद कुटुंबातील दोन तरुण साहिल आणि नदीम हे ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी गेले होते. दोन दिवसांनंतर त्यांच्या वडिलांना डिस्चार्जही मिळणार होता. दरम्यान दुर्घटनेवेळी ते सिलेंडर घेऊन आले. मात्र त्यावेळचा त्यांचा संवाद ‘ सिलेंडर लेके हम हॉस्पिटल में पहुंचे तब हमारे अब्बू रुक्सत हो चुके थे! और वार्ड में दूसरे बेड पर लेटी लेडीज पेशंट की साँसे अटक रही थी! ये देखकर तुरंत वो सिलेंडर, हमने वो पेशंट को दे दिया, और उसकी जान बच गयी! ये न ये न होता तो आज हमारे अब्बू जिन्दा होते, अशी भावना त्यानी घटनेनंतर बोलून दाखवली होती.