लागा तयारीला! मनपा निवडणुकीसंदर्भात नगरविकास मंत्रालयाने दिले ‘हे’ आदेश

नाशिक । प्रतिनिधी

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश संबंधित मनपा आयुक्तांकडे नगर विकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. लवकरच राज्यात मनपा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणुकांना ब्रेक लागल्यानंतर इच्छुकांसह उमेदवारांचे तयारीवर पाणी फेरले होते. त्यामुळे सर्व ताकदीनिशी प्रचार सुरु असताना अचानक निवडणूका पुढे ढकलल्या. त्यामुळे प्रभाग रचना देखील रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता नंतर विकास मंत्रालयाकडून नव्याने प्रभाग रचना आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार आता तीन सदस्यीय प्रभाग रचना नुसारच निवडणूक होणार असून नव्या आदेशानुसार जुन्या प्रभाग रचनेत किती प्रमाणात बदल होणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. प्रभाग रचना अंतिम होण्याच्या टप्प्यात असतानाच राज्य शासनाने कायद्यात बदल करून निवडणूक प्रभाग रचनेचे अधिकार आपल्याकडे घेत ११ मार्च २०२२ रोजी या संदर्भातील अधिनियम जारी केला होता. याच वेळी ओबीसी आरक्षणाशिवाय मनपा निवडणूक घेणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे मनपा निवडणूक केव्हा होणार याबाबत आणि चिंता होती.

दरम्यान मनपा निवडणुकीची प्रभाग रचना राज्यशासन करेल या अधिनियमानुसार संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त यांना राज्य शासनाने नव्याने प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मुदत संपलेल्या व नजीकच्या काळात मुदत संपत असलेल्या आगामी मनपा निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई राज्य शासनाचा अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाच्या २८ डिसेंबर २०२१ व २७ जानेवारी २०२२ मधील नमूद कार्यपद्धतीचा अनुसरून तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.