धक्कादायक! नाशिकरोड कारागृहात पॅरोल घोटाळा उघड

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central jail) शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून लाखो रुपये घेत त्यांना पॅरोल मंजूर (Parole Granted) करण्यासह रेकॉर्डवरील शिक्षा कमी करणाऱ्या दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह एका लिपिकावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे दोन तुरुंगाधिकारी व लिपिक शिक्षा भोगणाऱ्या कैदी व त्यांच्या नातलगांकडून लाखो रुपये लाच (Bribe) घेऊन शिक्षा कमी करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कागदोपत्री खाडाखोड करून मुक्त किंवा शिक्षा कमी करत होते.

सन २०१७ मध्ये नाशिक रोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी शामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे, वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी कारागृहात शिक्षा बंदी असलेल्या तीन कैद्यांना त्यांच्या शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पैसे घेऊन कारागृहातून बेकायदेशीरपणे सोडले.

ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनतोडे तपास करीत आहेत.