नाशिक । प्रतिनिधी
गिरणारे जवळील (Girnare Village) वाडगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला (Leopard in Well) वन विभागाच्या (Nashik Forest Department) सहाय्याने विहिरीतून सुखरूप काढण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की गिरणारे जवळील वाडगाव येथील शेतात असलेल्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात फिरतारा बिबट्या पडला होता. ही घटना ग्रामस्थांना कळताच त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. विहिरीत पाणी जास्त असल्याने या बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काही केल्या बिबट्या वर येईना.
शेवटी काही वेळातच घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले. विहीरीला पाणी असल्याने जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड सुरू होती. वनविभागाने या विहिरीत पिंजरा सोडून एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला वर काढण्यात यश आले. दरम्यान विहिरीतून बिबट्याचे सुखरूप सुटका केल्यानंतर या बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेतले.
या बिबट्याची आता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार असून नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. यापूर्वीही या परिसरात एका बिबट्याने चिमुरडीचा जीव घेतल्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.