नाशिक । प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात नाशिकहून सर्व फ्लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. सध्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने तसेच निर्बंधही उठवल्याने हवाई सेवा पुन्हा एकदा उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान नाशिकहून दिल्लीसाठी लवकरच विमान सेवा सुरु होणार असून हि सेवा स्पाइस जेट कंपनी करणार असून त्यांच्या नोंदणीसाठी लवकरच पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या उडान योजनेमुळे अनेक वर्षांपासून रखडलेली नाशिकची हवाई सेवा अखेरीस सुरू झाली, मात्र अनेक शहरांना नाशिक जोडले असतानाच कोरोनाचे संकट उद्भवले आणि त्यामुळे ही सेवा विस्कळीत झाली. हे संकट कळल्यानंतर काही कंपन्यांची सेवा पूर्ववत झाली असली तरी, स्पाइस जेटच्या सेवा बंदच आहेत.
उडान योजनेअंतर्गत संबंधितांना ५० टक्के तिकिटे अनुदानित स्वरूपात दिले जात असल्याने ही सेवा चालवण्याची सक्ती आहे. मात्र असे असतानाही स्पाइस जेट कडून दिल्ली, गोवा, हैदराबाद, बंगलोर ही सेवा सुरू केली जात नव्हती. त्यामुळे दिल्लीसह अन्य शहरांना जाऊ इच्छिणाऱ्यांची मात्र गैरसोय होत होती.
आता मात्र कंपनीने तयारी पूर्ण झाल्याचे एचएएलला कळवले असून ०१ मे पासून तीन महानगरे आणि गोव्यासारख्या राज्याला जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. डीजीएसने उन्हाळी वेळापत्रकात या चारही शहरांसाठी टाईम स्लॉट उपलब्ध करून दिल्याने ही सेवा सुरू होऊ शकणार आहे. सध्या एअरलाइन्स कंपनीची नाशिक -अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली होपिंग तसेच नाशिक-पुणे-बेळगाव ही सेवा सुरू आहे. तसेच घोडावत ग्रुपच्या स्टार एअरची नाशिक बेळगाव ही सेवाही सुरू आहे.