दुर्दैवी! एकीकडे सासूचा अंत्यसंस्कार, दुसरीकडे सुनेला विजेचा शॉक


नाशिक | प्रतिनिधी

आजरसासूचा अंत्यसंस्कार करून परतलेल्या नवविवाहितेचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना देवळा तालुक्यातील सावकी येथे घडली आहे.

आकांक्षा कचवे असे मृत महिलेचे (Woman) नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आकांक्षा यांचे लग्न दीड वर्षापूर्वी देवळातल्या सावकी येथील कचवे कुटुंबात झाले होते.

आकांक्षांच्या आजेसासूचे निधन झाले होते. त्यांचा अंत्यसंस्कार आटोपून आकांक्षा घरी आल्या. कुटुंबातील सगळ्यांनी अंघोळी केल्या. घरातील कपडे धुणे झाल्यानंतर आकांक्षा ते वाळत टाकत होत्या. मात्र, कपडे वाळत टाकण्याच्या तारेत अचानक विजेचा प्रवाह उतरला. याचा जोरदार धक्का आकांक्षाला लागला. त्यांचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला.

एकाच घरात लागोपाठ असे दोन आघात बसल्यामुळे कचवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यात नवदाम्पत्याचा संसार असा अर्ध्यावर मोडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.