नाशिक पोलिसांनी केली धाडसी घरफोडीची उकल; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून नाशिक पोलीस आता कंबर कसून घरफोडी करणाऱ्यांच्या मागावर लागल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांनी आणखी एक धाडसी घडफोडी उघडकीस आणली आहे. यात चोरीस गेलेला १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकला यश आले आहे. मिळालेल्या बातमीवरून गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने गंधर्व नगरी, मोटवाणी रोड, दत्तमंदिर येथील उत्सव मंगल कार्यालयासमोर सापळा लावुन संशयितांना ताब्यात घेतले आहेत.

रोहन भोळे (वय ३५), ऋषीकेश काळे (वय २६) अशी संशयतांची नावं आहेत. संशयीतांकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी मे महिन्यात जय भवानी रोड येथे एक बंगल्याची रेकी करत रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी केल्याचे कबुल केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात सोहनलाल रामानंद शर्मा (रा जयभवानीरोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल होता.

गुन्हयात चोरीस गेलेल्या दागिण्यांबाबत चौकशी केली असता संशयितांनी हे दागिने ओळखीच्या सोनाराकडे विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. दरम्यान या सोनाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हे दागिने सराफ बाजारातील एका ज्वेलर्सच्या दुकानात विकल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी त्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन विचारपूस केली. हे दिलेले दागिने वितळवून त्याची लगड (वीट) केली असल्याचं समजलं.

दरम्यान १६,१५,५४७ रुपये किमतीची एक तर ०१,७०,७५७ किमतीची दुसरी लगड (वीट) पोलिसांनी जप्त करत १७ लाख ८६ हजार ३०४ याप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यासोबत बंगल्यावर रेकी करताना वापरलेली स्विफ्ट कार आणि सुझुकी कंपनीची एक्सेस मोपेड यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हा तर चोरी केलेला माल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली तीन वाहने असा एकूण ५० लाख २४ हजार ८०४ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. युनिट दोनच्या पथकाने ही मोठी कामगिरी पार पाडली आहे.