Video : नाशिक पोलीस आयुक्तांना हवीय बदली? पहा नेमकं प्रकरण काय?

नाशिक । प्रतिनिधी
कौटुंबिक कारण देत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी बदलीसाठी अर्ज केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्त दीपक पांडेय हे चर्चेत आहेत. हेल्मेट सक्ती असो कि नारायणे राणे यांच्यावरील गुन्हा असो ते नेहमी वादात सापडले आहेत. अशातच पोलीस आयुक्त पांडेय यांनी आता गृहविभागाकडे बदलीसाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

पहा काय म्हणालेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय :

https://www.youtube.com/watch?v=IMP2KcDhric

नाशिकची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी हेल्मेट सक्ती मोहीम सुरु केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत हेल्मेट सक्ती सक्तीबाबत अनेक क्लुप्त्या त्यांच्याकडून करण्यात आल्या. आताही नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. यावरही नाशिककर तसेच पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

तर मंत्री नारायण राणेंचे प्रकरण देखील चांगलेच गाजले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा त्यांनी दाखल केला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त पांडेय चर्चेत आले होते. आयुक्तांच्या या निर्णयापासूनच त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार असल्याची चर्चा होती. तसेच गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्हेगारीत झालेली वाढ यामुळे देखील त्यांच्यावर अनेक राजकारणी आणि नाशिककरांकडून टीकाही करण्यात आली.

दरम्यान पोलीस आयुक्त पांडेय यांनी स्वत:च नाशिकमधून बदलीसाठी अर्ज केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे गृहविभाग काय निर्णय घेतात याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे.