कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी लवकरच लस येणार; नाशिकमध्ये संशोधन सुरु..

By चैतन्य गायकवाड

कॅन्सरचे (cancer) नाव ऐकताच प्रत्येकालाच आपला जीव नकोसा वाटतो. कारण, एकतर हा आजार असा आहे की, कॅन्सर झाल्यावर त्यावर मात करणे खूप जिकीरीचे असते आणि त्यावर अनुपलब्ध असलेली ठोस उपचार (treatment) पद्धत. कॅन्सर हा असा आजार आहे, ज्यामध्ये काही कारणास्तव शरीरातील काही पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढतात. तत्काळ उपचार न झाल्यास हा कर्करोग आजूबाजूच्या सामान्य ऊतींमध्ये, पेशींमध्ये (cells) किंवा शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. असे झाल्यास गंभीर आजार, अपंगत्व आणि मृत्यूदेखील होऊ शकतो.

या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅन्सरवर लस निर्माण करण्यासाठी आपल्या नाशिकमध्ये (Nashik) संशोधन सुरु आहे. कर्करोग हा गंभीर आजार होऊच नये आणि ज्या रुग्णांना कॅन्सर झालेला आहे, ते रुग्णही लवकर बरे व्हावेत, याकरिता प्रभावी लस निर्माण करण्याचे संशोधन सुरू आहे. नाशिकमधील प्रसिद्ध दातार कॅन्सर जेनेटिक्स (Datar Cancer Jenetics) या कॅन्सरवर दोन प्रकारच्या लस विकसित करत आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोन लस मधील एका लशीची चाचणी कॅन्सरग्रस्त श्वानांवर यशस्वी झाली आहे. या लशीची परिणामकारकता (effectiveness) किती यावर उर्वरित चाचण्या घेण्यात येणार आहे. या चाचण्या ऑगस्टपासून सुरू होत आहे. या लशीची परिणामकारकता सिद्ध झाल्यास आणि सकारात्मक रिझल्ट आल्यास नाशिकसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे. तसेच जगासाठी ही अमूल्य भेट ठरणार आहे.

प्रत्यक्षात कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आज ज्ञात आहेत. हा कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान घटक म्हणजे पेशींची झालेली अनियंत्रित वाढ होय. सामान्यपणे, शरीरातील पेशींचे विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या गरजेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजन होण्याची ही सामान्य पद्धत आहे. मात्र, काही वेळा या पेशींचे विभाजन नव्या पेशींची गरज नसतानाही होत असते. या अतिरिक्त वाढ झालेल्या पेशींचे गाठोडे म्हणजेच ट्यूमर होय. त्यालाच कॅन्सर म्हणतात. सध्या या कॅन्सर वर तीन उपचार पद्धती प्रचलित आहेत. १. रसायनोपचार (Chemotherapy), २. किरणोपचार (Radiotherapy), ३. शल्य चिकित्सा (Surgery).

या गंभीर आजारामुळे जगभरात दरवर्षी सुमारे ८० ते ८५ लाख, तर भारतात साधारणतः आठ ते नऊ लाख रुग्ण मृत्युमुखी पडतात. मात्र, या दुर्धर आजारावर जगभरात फारसे संशोधन होताना दिसत नाही. जवळपास ८० टक्के रुग्ण कर्करोगाचे निदान करण्यास उशीर झाल्याने मृत्यूमुखी पडतात. दातार जेनेटिक्सचे या कॅन्सरचे लवकर निदान करणाऱ्या चाचण्यांवरचे संशोधन यशस्वी झाले आहे. आता कॅन्सरवर प्रभावी परिणाम करणारी लस विकसित करणे ही संपूर्ण जगाची आवश्यकता आहे. या कॅन्सरवर दोन प्रकारच्या लशींवर संशोधनाचे काम नाशिकमध्ये सुरु आहे. ज्यांना कॅन्सर झालेला आहे, त्यांना बरे करण्यासाठी एका लशीवर पाच वर्षांपूर्वीच संशोधन सुरू झाले.