नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित गृह स्वप्नपूर्ती करणाऱ्या क्रेडाई प्रोपर्टी एक्सपोची तयारी पुर्णत्वास येत आहे. १४ ते १७ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या क्रेडाई प्रोपर्टी एक्सपोचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिलीये.
स्वतःचे घरकुल असणं हा एक सुखद अनुभव असतो तसेच घर आणि प्लॉट यामधील गुंतवणूक अन्य गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देत असते. अशात गुंतवणुकीचा उत्तम पर्याय बघणार्यांसाठी क्रेडाई प्रोपर्टी एक्सपो एक उत्तम संधी आहे. विमान, रस्ते तसेच रेल्वेद्वारे नाशिकची कनेक्टिविटी वाढतेय सोबतच शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी निओ मेट्रो प्रकल्प, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क असे प्रकल्प येऊ घातल्यामुळे नाशिकच्या विकासाचा वेग अजून जलद होणार असून भविष्याचा विचार करून रियल इस्टेट क्षेत्रात नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच ती वेळ असल्याचे प्रतिपादन प्रॉपर्टी एक्सपोचे समन्वयक अनिल आहेर यांनी केले.
क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्य संस्था आहे. या संस्थेचे सदस्य आदर्श कोड ऑफ कंडक्टचे पालन करतात. त्यामुळे ग्राहकांना व्यवहाराबाबत पूर्ण खात्री असते. या प्रदर्शनामध्ये क्रेडाईचे सदस्य असलेलेच बांधकाम व्यावसायिक सहभागी होत असल्याचं अनिल आहेर यांनी सांगितलंय.
डोंगरे वसतिगृह मैदानावर पूर्णपणे वातानुकूलित अशा तीन डोममध्ये ७० हून अधिक बांधकाम व्यवसायिकांच्या पाचशेहून अधिक प्रकल्पाची सखोल माहिती एकाच छताखाली मिळणार असून गृहकर्जासाठी आघाडीचे गृहकर्ज देणाऱ्या बँकेचंही वेगळं दालन येथे असणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ अशी असून अधिकाधिक नागरिकांनी आपले गृहस्वप्न येथेच पूर्ण करावं असं आवाहन प्रदर्शनाचे सहसमन्वयक मनोज खिंवसरा यांनी केलंय.
दरम्यान या प्रदर्शनासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, किरण चव्हाण, नेमीचंद पोतदार उमेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी विशेष परिश्रम घेत आहेत.