नाशिकच्या रोहित पवारचा अमेरिकेत डंका; आयर्नमॅन स्पर्धेत अव्वल..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : अमेरिकेतील (America) देस मोइंस (Des Moins) येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत (Ironman competition) नाशिकच्या रोहित सुभाष पवार याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने निर्धारित वेळेच्या अडीच तास अगोदरच ही स्पर्धा पूर्ण केली आहे. शहरातील सातपूर परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर सुभाष पवार यांचा रोहित हा सुपुत्र आहे. विशेष म्हणजे डॉ. सुभाष पवार यांनीदेखील गेल्यावर्षी आयर्नमॅनचा किताब पटकावला होता. सुभाष पवार यांनी २१ नोव्हेंबर २०२१ मध्ये हा किताब मिळवला होता. सुभाष पवार हे भारतातील सर्वात वयोवृद्ध आणि जलद स्पर्धा पूर्ण करणारे आयर्नमॅन ठरले आहे. आता त्यांचा चिरंजीव रोहित याने देखील अमेरिकेतील देस मोइंस येथे झालेली स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आयर्नमॅन झालेले बाप-लेकाची ही जोडी नाशिकसाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब ठरली आहे.

रोहित याने रविवारी (१२ जून) देस मोइंस (अमेरिका) येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत जवळपास 14 तासांचा खडतर प्रवास करून ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेसाठी १७ तासांची वेळ निर्धारित केली जाते. या स्पर्धेत स्विमिंग (sweeming), सायकलिंग आणि धावणे (running) अशे तीन टप्पे असतात. या स्पर्धेत सभागी होणाऱ्या स्पर्धकास दोन तासांत चार किलोमीटर स्विमिंग, आठ तासांत १८० किलोमीटर सायकलिंग आणि सहा तासांच्या वेळमर्यादेत ४२ किलोमीटर धावणे असे तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. हे खडतर आव्हान रोहित पवार याने निर्धारित वेळेच्या अडीच तास अगोदरच पूर्ण करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत रोहितने १ तास २५ मिनिटात ४ किलोमीटर स्विमिंग, ६ तास ५२ मिनिटात १८० किलोमीटर सायकलिंग आणि ५ तास ५० मिनिटात ४२ किलोमीटर धावणे असे तीनही टप्पे पूर्ण केले. त्यामुळे त्याने नियोजित वेळेच्या २ तास २८ मिनिटे आधीच ही स्पर्धा जिंकली आहे. रोहितने आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन या स्पर्धेसाठी सराव सुरु केला होता. रोहित सध्या अमेरिकेतील फ्लोरिडा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहे.

डॉ. सुभाष पवार ह्यांनी देखील गेल्यावर्षी कोझोमेल, मेक्सिको येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत वयाच्या ६६ वर्षी भाग घेत ही स्पर्धा जिंकली होती.
त्यांनी देखील निर्धारित १७ तास वेळेच्या २ तास आधीच स्पर्धा जिंकली होती. आयर्नमॅन किताब पटकावत त्यांनी भारतातील सर्वात वयोवृद्ध व जलद वेळेत आयर्नमॅन होण्याचा मान पटकावला आहे. आता रोहित पवार यांनी वडिलांचा जलद वेळेचा विक्रम तोडत त्यांच्या पेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली आहे. मुलाने ही खडतर स्पर्धा पूर्ण करून, आपला विक्रम तोडल्याचा आनंद व समाधान डॉ. सुभाष पवार यांनी व्यक्त केला आहे.