“शिवसेनेचे हायकमांड मातोश्रीवर; दिल्लीत नाही.”-संजय राऊत यांचा टोला

By चैतन्य गायकवाड

नाशिक: शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी संजय राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ‘त्यांचे हायकमांड दिल्लीत बसलेले आहे, पण शिवसेनेचे हाय कमांड मातोश्रीवर आहे.’ असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, “ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण दिल्लीत हाय कमांडच्या भेटीला गेलेले आहेत. शिवसेनेचे हाय कमांड मातोश्रीवर आहे. कुणी म्हणत असेल, हे शिवसेनेचे सरकार आहे, त्यांनी लक्षात घ्यावे की शिवसेनेचे हाय कमांड मातोश्री आहे, दिल्ली नाही.” असा हल्लाबोल राऊत यांनी केला

बेळगाव केंद्रशासित प्रदेश करावा
संजय राऊत म्हणाले की, “सीमा भागात पुन्हा अत्याचार सुरू झाला आहे. ठाकरे सरकार गेल्यापासून सीमा भागात त्रास वाढला आहे. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत. केंद्रात आणि कर्नाटकात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे, त्यामुळे बेळगावसह सीमा भागातील मराठी लोकांवर अत्याचार होत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत, हा संपूर्ण भाग केंद्रशासित करावा. तसेच अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे मांडावी.” अशी मागणी संजय राऊत यांनी केली. या संदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केले.

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत
तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. तसेच शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्यानंतर, या प्रश्नावर राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की “खासदार संपर्कात आहे, असं कोणी जाहीर केले. माध्यमांचे सूत्र हे सर्व भाजपचेच सूत्र आहेत.” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.