नाशिक हादरलं..! तिसर्‍या मजल्यावरून तोल जाऊन वृध्द महिलेचा मृत्यू

नाशिक : बाल्कनीतून तोल जाऊन एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. मंगला दत्तात्रय दळवी असं वृद्ध महिलेचे नाव असून त्या ७५ वर्षांच्या होत्या. बाल्कनीतून त्यांचा अचानक तोल गेल्यामुळे त्या थेट बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली कोसळल्या. उंच इमारतीवरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरातील ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून बांधकाम व्यावसायिकांनी देखील इमारत उभारतांना सुरक्षित गॅलरी कराव्यात, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरिक्षक चव्हाण यांनी केले.

पहा घटनेचा सीसीटीव्ही

नाशिकमध्ये मागच्या महिन्यातही अशीच एक भयानक घटना घडली होती. या घटनेत पहिल्या मजल्यावरुन पडून अवघ्या १८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. नाशिकच्या पवन नगर ज्योती अपार्टमेन्ट मध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. बाल्कनीत खेळत असताना चिमुकलीचा तोल गेला होता.