By चैतन्य गायकवाड
नाशिक : शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Shivsena leader MP Sanjay Raut) हे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मिळावे घेत आहे. संजय राऊत हे सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून, त्यांनी यावेळेस नाशिक रोड येथे मेळावा घेतला. त्यांनी या मेळाव्यात बोलताना, बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. मेळाव्यात बोलताना खा. संजय राऊत यांनी आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुलाबरावांचा जुलाबराव होईल, त्यांना देण्यात आलेले ५० खोके पचणार नाहीत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
गुलाबरावांचा जुलाबराव होणार
यावेळी संजय राऊत म्हणाले की, “आमदारांकडून बंडखोरी बाबत विविध कारणे देण्यात येत आहे. निधी मिळत नसल्याचे कारण हे सांगत असले तरी त्यांचे दुखणं वेगळच आहे. या गुलाबरावांचा लवकरच जुलाबराव होईल, त्यांना देण्यात आलेले ५० कोटी पचणार नाहीत.” असे म्हणताना संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. या खोकेबाजीला ठोकेबाजीने उत्तर देऊ, असा इशारा देखील राऊत यांनी दिला.
धनुष्यबाण हातात ठेवा
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणाले की, ” ईडी मागे लागली म्हणून आम्ही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही. भले जेलमध्ये जाऊ. शिवसेना सोडली म्हणून छगन भुजबळ हरले, नारायण राणे हरले. तुम्ही फक्त धनुष्यबाण हातात ठेवा, कधी सोडायचा, ते सांगतो.” असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आज नाशिक मधील चित्र हे प्रेरणादायी आहे. भविष्यात सत्तेचे दार हे नाशिक मधूनच उघडले जाणार आहे, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
आम्ही रायगडाला सलाम करतो
यावेळी संजय राऊत म्हणाले की, “आम्ही लाल किल्ल्याला सलाम करत नाही. आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हाय कमांड दिल्ली नाही, तर मातोश्री आहे. दिल्ली वाल्यांना मुंबई तोडायची आहे म्हणून शिवसेना तोडली. त्यांना महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहे.” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच धनुष्यबाण शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा पंचप्राण आहे. त्यामुळे धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल. हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला.