आ. सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव; मत बाद करण्यावर आक्षेप..

By चैतन्य गायकवाड |

मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha) ६ जागांसाठी राज्यात शुक्रवारी (दि. १० जून) निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी रंगतदार लढाई झाली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत भाजापाने (BJP) महाविकास आघाडीला (MVA) धोबीपछाड दिला. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीच्या ३ मतांवर आक्षेप घेतला होता. त्यातील एक मत केंद्रिय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) बाद ठरवले होते. शिवसेनेचे (Shivsena) नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे (Nandgaon Assembly constituency) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत निवडणूक आयोगाने अवैध ठरवले होते. त्याचा फटका महाविकास आघाडीला निवडणुकीत बसला. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मोठी घडामोड पाहायला मिळाली. मतदान झाल्यानंतर भाजपाने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad), काँग्रेसच्या (Congress) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांचा समावेश होता. त्यानंतर भाजपाने केंद्रिय निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. त्यामुळे मतदान मोजणी थांबविण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांचे मत वैध ठरवले होते. मात्र, सुहास कांदे यांचे मत अवैध ठरविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. या मत बाद करण्यावर सुहास कांदे यांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उच्च न्यायालयात (High court) याचिका दाखल केली आहे. मत बाद केल्यानंतर निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी या याचिकेत केला आहे.

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत रद्द करण्याचे आदेश दिले होते. सुहास कांदे यांनी मत पत्रिकेवर मतदान केल्यानंतर मतपत्रिका घडी न घालता तशीच ठेवल्याने त्यांचं मत रद्द करण्यात आले होते. दरम्यान, या राज्यसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीने देखील भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) तसेच अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मतावर देखील आक्षेप नोंदवला होता. मात्र, निवडणूक आयोगाने या दोघांची देखील मते वैध ठरवली होती. या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव करत विजय मिळवला होता.