धक्कादायक: प्रेमभंग झाल्याने प्रियकराने पेटवून घेत केली आत्महत्या

नाशिक : पंचवटीतील (Panchavati) हिरावाडी (Hiravadi) भागात एका प्रियकराने प्रेमभंग झाल्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे. या दुर्दैवी घटनेतील अल्पवयीन मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

प्रेमाला काही वय नसते. प्रेम कधीही आणि कुणावरही होऊ शकतो. या प्रेमाच्या रेशीम बंधात काहीजण यशस्वी होतात, तर काही अपयशी ठरतात. मात्र प्रेम भंगातून आलेल्या निराशेपोटी काहीजण टोकाचा निर्णय घेऊन, आपल्या आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात. हे अयोग्य आहे. दुर्दैवाने पंचवटीतील हिरावाडी भागात अशीच घटना घडली आहे. एका अल्पवयीन प्रेमवीराने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे.

दरम्यान, याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलाचे मुलीवर प्रेम जडले. मात्र काही कारणाने प्रेयसीसोबत ह्या प्रियकराचे वाद झाले होते. त्यामुळे या प्रियकराने काही विचार न करता, संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी (दि. २४ जून) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हिरावाडी मधील एका मंदिरामागे घडली.

ह्या प्रियकराने बाटलीत पेट्रोल आणून, स्वतःच्या अंगावर टाकून स्वतःला पेटवून घेतले. त्याला तातडीने नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात (civil hospital) दाखल केले. या दुर्दैवी घटनेत तो ६१ टक्के भाजला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आठवडाभर त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, रविवारी (दि. ३) या मुलाचा मृत्यू झाला.

हिरावाडी परिसरात घडलेल्या हा घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अल्पवयीन मुलाने संतापाच्या भरात इतका टोकाचा निर्णय घेतल्याने तो आयुष्याला मुकला आहे. दरम्यान, याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृत मुलाच्या पश्चात आई, वडील, दोघे भाऊ असा परिवार असल्याची माहिती मिळाली आहे.