Home » नाशिककरांनो सावधान..! आजपासून हेल्मेट वापराच, नाहीतर..

नाशिककरांनो सावधान..! आजपासून हेल्मेट वापराच, नाहीतर..

by नाशिक तक
0 comment

नाशिक : शहरात आजपासून हेल्मेट सक्ती मोहीमेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ठिकठिकाणी हेल्मेट तपासणी मोहीमही राबवली जात आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या नागरिकांवर आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाईल. वाढत्या अपघातामुळे आजपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार या निर्णयाची अंबलबजावणी आज पासून सुरु होत आहे.

शहरात पुन्हा एकदा दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. १ डिसेंबर २०२२ म्हणजेच आज पासून ही मोहीम शहरात अधिक तीव्र करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात दुचाकीच्या झालेल्या अपघातात हेल्मेट न घातल्याने ८३ चालकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर, जवळपास २६१ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट महत्वाचे असताना देखील दुचाकी चालक दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवले होते. त्यानुसार आजपासून ही कारवाई करण्यात येत आहे.

आज पासून दुचाकी चालकाने हेल्मेट न घातल्यास कारवाई करण्यात येईल. हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड ठोठावला जाईल. यामध्ये कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस कारवाईला ठाम असतानाच त्याचे पडसाद उमटत आहेत. पोलिसांनीच हेल्मेट भेट द्यावं अशी मागणी देखील समोर आली आहे.

या आधीही नाशिकमध्ये हेल्मेट सक्तीची मोहीम राबविण्यात आली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिककरांची सुरक्षा लक्षात घेता हेल्मेट सक्ती ही मोहीम अधिक तीव्र प्रमाणात अमलात आणली होती. त्यावेळी दीपक पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेली ‘ नो हेल्मेट, नो पेट्रोल” ही मोहीम राज्यभरात चांगलीच गाजली होती. याकरिता त्यांना अनेक वेळा विविध संघटनांचा विरोध देखील झाला होता. मात्र विरोध झुगारत त्यांनी अनोखे उपक्रम राबवून हेल्मेट सक्ती मोहिमेला बळ दिलं होत. तशीच मोहीम आता पुन्हा हाती घेण्यात आली आहे. यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेनंतर नाशिकचे तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांची काही दिवसांत बदली झाली. त्यामुळे हेल्मेट सक्तीची मोहीम जरा थंड पडली. मात्र आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली आहे. आजपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्यावर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. कारवाईला सामोरे जायचे नसल्यास चांगल्या प्रतीचे हेल्मेट दुचाकी धारकांना वापरणे बंधनकारक आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!