दिंडोरी । प्रतिनिधी
दिंडोरी (Dindori) तालुक्यातील पळसविहिर (पिंपळपाडा) (Palasvihir) येथे आज (२८ एप्रिल) सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट (gas Cylinder exploded) होऊन लागलेल्या आगीत संसार उद्धवस्त झाला आहे. सुदैवाने कामानिमित्त घरातील लोक बाहेर गेल्याने जीवित हानी झालेली नाही. मात्र या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पळसविहीर (Palasvihir) येथे राहणारे बाळू, मनोहर आणि देविदास जाधव यांच्या मालकीचे हे घर आहे. घरातील सगळे जण मळ्यात कामासाठी गेले असता सकाळी सुमारे ८.३० वाजता अचानक घरातील सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण घराला आगीने आपल्या ताब्यात घेतले. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, घरातील सगळ्या उपयोगी आणि गरजेच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
सुदैवाने, घरातील व्यक्ती कामासाठी मळ्यात गेल्याने जिवितहानी टळली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आग मोठया प्रमाणात असल्याने घरातील संपूर्ण साहित्य बाहेर काढणे शक्य झाले नाही. या आगीमध्ये घरातील धान्य, दागिने, रोख रक्कम, कपडे आणि इतरही गृहपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जाधव कुटूंब हादरले आहे.
.
मदतीचे आवाहन
आनंदीबाई विष्णू जाधव, कमलाकर विष्णू जाधव व मनोहर विष्णू जाधव यांच्या घराला भीषण आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या हानीतून वर येण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.