नाशिक । प्रतिनिधी
वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात ‘कमल का फुल एप्रिल फुल’च्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज नाशिकच्या विनय नगर येथील पेट्रोल पंपवर आंदोलन करण्यात आले.
मागील काही दिवसापासून देशात महागाई उच्चांक गाठत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीही वाढल्या असल्याने करीत नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
यावेळी मोदींजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस असा पंतप्रधान मोदी यांचा फोटो असलेला प्रतिकात्मक केक हा गाजरांनी कापून हे आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करण्याचे आश्वासन देत पंतप्रधानानी भारताच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. महागाईने देशातील जनता ही होरपळली असून पंतप्रधानांनी देशातील जनतेचा एप्रिल फुल केल्याचे देखील यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने केला आहे.
दरम्यान केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे (Petrol diesel price) सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी; यासाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले.