‘आता भारताची बारी’..! आनंद महिंद्राच्या ट्वीटला रामचरणचे उत्तर

आर आर आर या भारतीय चित्रपटाने भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टी गाजवली आहे. तर दुसरीकडे या चित्रपटातील कलाकार देखील भारताचे नाव गाजवत आहे. नुकतेच राम चरण याने गुड मॉर्निंग अमेरिका या कार्यक्रमात हजेरी लावली आणि काही विषयांवर चर्चा केली. याचा व्हिडीओ प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्र म्हणतात, ‘हा माणूस आता ग्लोबल स्टार झाला आहे’ (This man is a Global Star). विशेष म्हणजे यावर उत्तर देत रामचरणने ‘खुप खूप धन्यवाद सर ! भारताने आता प्रत्येक क्षेत्रात आणि फॉर्ममध्ये चमकण्याची वेळ आली आहे.’ (Thank you so much Sir! It’s India’s time now to shine in every field and form) असे म्हंटले आहे. नक्कीच रामचरणचे हे उत्तर वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.

RRR चित्रपटाच्या या यशाने मनोरंजन विश्वात भारताचे नाव मोठ्या ताकतीने उभे केले आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने तर अनेकांची मनं जिंकली आहे. राम चरण आणि ज्युनिअर एन.टी.आरचा (Ram Charan, and Jr. N.T.R) एनर्जेटिक डान्स तर ‘सोने पे सुहागा’ म्हणावा. म्हणूनच तर या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतासाठी आणि भारतीय सिनेसृष्टी साठी आर आर आर चित्रपटाचे हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे. दरम्यान थोडक्यात आता भारताची बारी आहे असे रामचरण म्हणाला आहे.

दक्षिण भारतीय सिनेमे म्हणजे South Film Industry सध्या भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केट देखील गाजवत आहे. या सिनेम्यांनी आणि कलाकारांनी चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. पुष्पा, बाहुबली, के जी एफ, आर आर आर असे कितीतरी उदाहरणं या सिनेम्यांच्या जादूची साक्ष देतात. टशन आणि ॲक्शनने भरपूर असलेले सिनेमे चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. तसेच राज्य आर आर आरने देखील केले. केवळ भारतीयच नाही, तर अंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या चित्रपटाने धूम केली आहे.

अमेरीकेत प्रदर्शित होणार ‘RRR’ चित्रपट

एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या पेक्षाही मोठी आणि भारतीय सिनेसृष्टीची मान अभिमानाने उंचावणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट ३ मार्च रोजी अमेरीकेतील २०० पेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स यांनी घेतला आहे. त्यांनी याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे.