By चैतन्य गायकवाड
शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० बंडखोर आमदारांनी वेगळा गट निर्माण केला आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्याने अतिशय नाट्यमयरित्या मुख्यमंत्री देखील झाले. मात्र, आता शिवसेनेचे काही खासदार देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदारांसोबत शिवसेनेचे खासदार आणि अन्य नेते देखील फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या नाराज खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shreekant Shinde) यांच्याबद्दल सुरु आहे. तर उर्वरित खासदारांमध्ये विदर्भातील खासदार भावना गवळी, तसेच दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांचे देखील नाव घेतले जात आहे. यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्या नाराजीचे कारण म्हणजे, त्यांच्यामागे सक्तवसुली संचालनालयाचे शुक्लकाष्ट लागले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जावे, असे पत्र देखील उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.
तसेच आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप (BJP) प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन, वेगळा मार्ग निवडत उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
या घटनांवरून शिवसेनेतील खासदार देखील नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राहुल शेवाळे, भावना गवळी, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास १२ खासदार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. गुलाबराव पाटील यांनी तसा दावा देखील केला आहे.
आमदार गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट
बंडखोरीनंतर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) अनेक दिवसांनी आपल्या मतदारसंघात परतले आहे. यावेळी त्यांनी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही ४० आमदार बाहेर पडलो, आताही शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार आणि २० माजी आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. मतदारसंघात पोहचल्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.