ऐतिहासिक रामसेतू पूल धोकादायक बनला असून हा पुल तोडण्याबाबत स्ट्रक्चर ऑडिट निर्णय घेईल. अशी माहिती नाशिकचे महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली होती मात्र ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या, पंचवटी आणि मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या रामसेतू पुलाला तोडू देणार नाही, अशी भुमिका रामसेतु पुल बचाव समितीने घेतली आहे. कल्पना पांडे यांच्या अध्यक्षतेखाली रामसेतू पूल बचाव समितीने ही भुमिका स्पष्ट केली आहे.
‘रामसेतू पूल धोकादायक बनल्याने तो पाडायचा की नाही हा निर्णय स्ट्रक्चर ऑडिट घेणार आहे’ असं महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, ‘रामसेतू पूल पायी चालणाऱ्यांसाठी धोकादायक नाही, त्यामुळेच तो पाडण्यात येऊ नये, रामसेतू पूल पंचवटी आणि मुख्य बाजारला जोडतो त्यासोबतच हा पूल शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पूल आहे. त्यामुळे आम्ही हा पुल पाडण्याच्या विरोधात आहोत, अशात प्रशासनाने रामसेतू पुल तोडण्याचा निर्णय घेतला तर आंदोलना करू’, असा इशारा रामसेतू पुल बचाव समितीने दिला आहे.
पुराच्या पाण्यामुळे धोकादायक झालेल्या रामसेतू पुलाची पाहणी करून त्यासाठी विशेष समिती नेमली असल्याची माहिती महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली होती. नाशिक शहरात गोदावरी नदीला पूर आल्याने रामसेतू पुलावरून पाणी वाहत होतं. या पुराच्या पाण्यामुळे रामसेतू पूल धोकादायक झाला होता. पुलाला तडे जाऊन पूल काही प्रमाणात खचल्याच देखील निदर्शनास आलं होतं. त्यामुळे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समितीने या पुलाची पाहणी केली आणि ऑडिटचा रिपोर्ट आल्यावर रामसेतू पुलाबद्दल निर्णय होईल असं सांगण्यात आलं. जर स्ट्रक्चर ऑडिटनुसार पुल तोडायचा असेल, तर पुल तोडला जाईल.” अशी माहिती महापालिका आयुक्तांकडून देण्यात आली होती.
मात्र आता रामसेतू पूल बचाव समितीकडून हा पूल पाडण्यास विरोध होत असून ऐतिहासिक रामसेतू पुलावरून स्थानिक विरुद्ध प्रशासन आमनेसामने आले आहेत अशी परिस्थिती दिसून येत आहे.