राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले की…

By चैतन्य गायकवाड |

शिवसेना नेते (Shivsena leader) आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री (Minister for Urban Development and Public Works) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत खळबळ निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला (MVA) देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यात सर्व प्रमुख पक्ष सतर्क झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी, आमदार (MLAs) आणि खासदार (MPs) यांची बैठक बोलावली आहे. तसेच महाविकास आघाडीतील आणखी दोन प्रमुख पक्ष असलेले काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे देखील आपल्या पक्षाची बैठक घेणार आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्व घटनाक्रमावर योग्य तो तोडगा काढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, या सर्व परिस्थितीतून नक्कीच मार्ग निघेल. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर ते म्हणले की, ‘एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. हे सरकार योग्यरीत्या कामकाज करत असल्यानेच, या सरकारविरोधात षडयंत्र रचले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे सरकार पाडण्याचे असे प्रयत्न होत आहे.’

दरम्यान, काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानात ‘क्रॉस वोटिंग’ (cross voting) झाल्याची चर्चा आहे. यावर पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले की,’या निवडणुकीत काही प्रमाणत ‘क्रॉस वोटिंग’ झाले. पण, क्रॉस वोटिंग नंतरही सरकार चालते, हा माझा ५० वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे कालच्या निकालाने सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही.’ यावेळी पत्रकरांनी महाराष्ट्रातील सरकार पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हटले की, ‘सरकार पडल्यास आम्ही विरोधी बाकावर बसू. पण भाजपबरोबर जाणार नाही.’