नाशिक । प्रतिनिधी
एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना यांना मागे टाकत लिंबू मिरच्यांनी तापमानाचा पारा वाढविला आहे. तब्बल २०० ते २५० रुपये किलोने लिंबू विक्री होत असल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
सध्या तापमान वाढीमुळे होणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. अशात उकाड्यामध्ये शीतपेय पिण्याकडे सर्वांचा कल असतो. बरेच लोकं लिंबू सरबत पिणे पसंत करतात. अशामध्ये आता प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या लिंबाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. लिंबाचे भाव पेट्रोल-डिझेल पेक्षाही महाग झाले आहेत. लिंबाची प्रतिकिलो किंमत आता २०० ते २५० रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे गृहिणीच्या किचनचे बजेट कोलमडले आहे. आजच्या घडीला लिंबाचे भाव पेट्रोल-डिझेल पेक्षा महाग झाले असून मिरची व कोथिंबीरीचे दरही मोठया प्रमाणात वाढले आहेत. लिंबाची प्रतिकिलो किंमत आता 200 ते २५०, मिरची ८० ते १०० रुपये तर कोथिंबीतिची जुडी २० ते ४० रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे गृहिणीच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबूला व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला गेला असून उन्हाळ्यात लिंबू आपल्याला हायड्रेट ठेवतो. तसेच पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी लिंबू उपयोगी ठरतो. त्यात सध्या उन्हाळा सुरु असल्याने लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने लिंबाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. भाववाढ झाल्याने लिंबाच्या खरेदीवर देखील परिणाम झाला असून बऱ्याच लोकांनी लिंबू खरेदी करणे कमी केले आहे. फक्त मोजकेच लोक सध्या लिंबू खरेदी करत आहे. लिंबासह भेंडी, भोपळा, हिरवी मिरची आणि हिरव्या पालेभाज्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत.
उन्हाळ्यात ऑफिसला जाणारे तसेच रोजंदारी करणारे सर्वसामान्य नागरिक वाढत्या तापमानापासून बचाव व्हावा यासाठी लिंबू सरबत पितात. सर्वसामान्यांना परवडणारे हे शीतपेय आहे. मात्र सध्या लिंबू सरबत विकणाऱ्या गाड्यावर १० रुपयात मिळणारं लिंबू सरबत आता १५ ते २० रुपये ग्लास मिळत आहे.
किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून हिरवी मिरची किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो दराने मिळत आहे. यामुळे भत्त्याची दुकाने व हॉटेलमधून मिळणारी हिरवी मिरची गायब झाली आहे. कोथींबीरीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.यामुळे कोथिंबिरीची जुडी २० ते ४० रुपयांनी विकली जात आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात लिंबाचे दर क्विंटलला चार हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत होते तर मिरचीचे दर क्विंटलला ३००० ते ७५०० रुपयांपर्यंत होते. कोथिंबीर शेकडा ८५०० रुपयांपर्यत भाव होता.