नाशिक: सध्या राज्यात भोंग्याचा (loudspeaker) मुद्दा गाजत आहे. तसेच वाराणसी (Varanasi) येथील ज्ञानवापी मशिद (Dnyanvapi Masjid) व महादेव मंदिर या जागेचा वाद सुरु आहे. या अनुषंगाने नाशिक (Nashik) शहरात कायदा व सुव्यवस्था (law and order) अबाधित राहावी, याकरिता नाशिक शहर पोलिस आयुक्त (Police Commissioner) जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी १५ दिवसांकरिता जमावबंदीचे (curfew) आदेश लागू केल्याचे परिपत्रक जाहीर केले आहे.
या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात दि. २९ मे ००.०१ वाजेपासून दि. १२ जून रोजी २४.०० वाजेपर्यंत १५ दिवसांकरिता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. या जमावबंदीच्या आदेशात पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी (public place) एकत्र जमून कुठल्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा, सभा, निदर्शने करता येणार नाही. तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे, कुठल्याही प्रकारचे हत्यार सोबत बाळगण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
सध्या विविध धार्मिक तसेच राजकीय मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तप्त आहे. भोंग्याचा मुद्दा तसेच वाराणसी येथील ज्ञानवापी मशिद व महादेव मंदिराचा मुद्दा या प्रश्नांसंदर्भात कधीही आंदोलनं किंवा मोर्चा निघू शकतात, यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी (police) हा निर्णय घेतला आहे. तसेच या दरम्यान शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी देखील तैनात असणार आहे.