संतापजनक..! मुल होत नाही म्हणून महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

पुरोगामी महाराष्ट्रात आजही मात्र काही मागासलेल्या विचारांमुळे स्त्रियांना अनेक अन्यायाचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत क्रूर घटना समोर येत आहे. मुल होत नाही म्हणून सुनेला दोषी धरत तिला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. अत्यंत लाजीरवाणा असलेला हा प्रकार नंदुरबार येथे घडला आहे. पिडीत महिला गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

हा अत्यंत संतापजनक प्रकार घडला असून महिला रक्तबंबाळ होईपर्यंत तिला मारहाण करण्यात आली आहे. एवढंच नाही तर मूल होतं नसल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला देखील केला. यावेळी त्यांनी तिला लाकडी दांडक्याने तसचे लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

सासरच्या मंडळींकडून सतत हा त्रास देण्यात येत असल्याची तक्रार महिलेने केली आहे. कायमच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलीस स्टेशन गाठत सर्व आपबीती पोलिसांना सांगत सासरच्या मंडळींची तक्रार नोंदवली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सासू, सासरा आणि दिर यांच्याविरुद्ध या प्रकरणी पोलिस ठाण्यात कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे. मात्र या घटनेतून ‘स्त्रियांच्या बाबतीत समाज पुढे गेला आहे. आता ते जुने चित्र राहिले नाही’ असे आपण कितीही म्हणत असलो तरी मात्र अनेक मागास भागांमध्ये महिलांवरील अन्याय अद्याप थांबले नाहीत. याचा प्रत्यत येत आहे.

गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे. त्यानुसार स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल.