संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत चिरला गळा..

नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची गळा चिरुन हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान हा संशयित आरोपिदेखील अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत मुलगी आणि संशयित आरोपी दोघेही फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सकाळच्या एका ९ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तपास केल्यानंतर या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत गळा चिरुन तिला जीवे मारल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. चौकशी दरम्यान एका तरुणावर संशय बळावल्याने पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानेच या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिची गळा चिरुन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. हा संशयित तरुण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला. दरम्यान पीडित मृत तरुणी आणि संशयित म्हणून ताब्यात घेतलेला तरुण हे दोघे फिरस्ता असून ते स्टेशन परिसरात राहत होते. पोलिसांनी या मृत पीडितेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमात ६ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असताना कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारल्याची ही घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दोन्ही घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले गेले आहे. नाशिकच्या घटनेत ७ मुलींवर अत्याचार झाला असून त्यात ६ अल्पवयीन आहे. दरम्यान राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

दरम्यान, राज्यभरात ठीकठिकाणी समोर येणाऱ्या या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश आधी असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा घटना समोर येत असल्यामुळे पालकांमध्ये देखील भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.