पालकांची चिंता वाढली! मुंबईनंतर नाशकातही ‘गोवर’चा शिरकाव

मुंबई पाठोपाठ मालेगावात देखील गोवरची साथ आली आहे. मालेगावात आतापर्यंत ४४ मुलांना गोवरची लागण झाली आहे. या मुलांवर सामान्य रुग्णालयात आणि महापालिकेच्या रुग्णलयात करण्यात उपचार करण्यात येत आहे. मात्र यामुळे नाशिक जिल्ह्यात मात्र पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील ४४ मुलांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गोवरची लागण झालेल्या मुलावर सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णलयात उपचार करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

गेल्या आठवड्यापासून गोवर रुबेलाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गोवरची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईमध्ये गोवर आजाराची लागण लहान बालकांना झाली आहे. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातही गोवर आजाराने प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहिती नुसार ६ बालकं ऑक्सिजनवर आहेत. तर नाशिक मध्ये ४४ बालके गोवरच्या सपाट्यात आळली आहेत.

मुंबईत सोमवारी १२ मुलांची गोवर आणि रुबेला या दोन्ही लक्षणांसाठी नोंद करण्यात आली. मुलांमध्ये या आजाराची तीव्रता वाढली तर न्यूमोनियाच्या त्रासाला मुले बळी पडू शकतात असे तज्ञांनी सांगितले आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करता गोवर रुबेलाचे लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचा सल्ला बालरोग तज्ञांनी दिला आहे.

गोवर रुबेला हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो. गोवर हा विषाणू पासून होणारा संसर्ग आहे. हा संसर्ग खोकण्यातून किवा शिंकण्यातून होतो. गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवर रुबेला झालेल्या रुग्णांमध्ये ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. यामुळे रुग्णाला अंधत्व येऊ शकते व या सोबतच रुबेला सोबत होणारा न्युमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये रुग्णाच्या श्वासनलिकेला सूज येऊन बालकांना किवा रुग्णांना श्वसन प्रक्रियेत त्रास होण्याची शक्यता असते. महत्वाच म्हणजे कुपोषित बालकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुबेलाचे प्रमाण आढळते. गोवर झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी खोकला, डोळे लाल होणे, सर्वसाधारणपणे अंगावर गुलाबी लालसर पुरळ ताप खोकला, साधारणता अशी लक्षणे दिसतात.

गोवर या आजारावर अजून तरी विशिष्ट असे काही औषध नाही. गोवर झालेल्या रुग्णाच्या रिकव्हरीसाठी रुग्णाने योग्य प्रमाणात विश्राम करणे गरजेचे आहे व त्या सोबतच रुग्णाच्या खानपाना मध्ये ‘अ’ जीवनसत्व असणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशी शिफारस केली आहे कि जगातील ज्या भागात हा रोग सामान्य आहे. अश्या ठिकाणी वयाच्या नवव्या महिन्यात किंवा ज्या ठिकाणी हा रोग सामान्य नाही अश्या ठिकाणी वयाच्या 12 महिन्यान पर्यंत गोवर रुबेला लस दिली जावी. २०१३ पर्यंत जगभरात ८५ टक्के मुलांना हि लस दिली आहे. गोवर ची लस प्रथम १९६३ मध्ये सुरु करण्यात आली. गोवरचा वाढता प्रादुर्भाव बघता तज्ञांनी लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला आहे.