पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जी यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी राज्यात जोर धरत होती. दरम्यान, आज ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर काही वेळातच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले.
पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री होते. केंद्रीय एजन्सी ईडीने २३ जुलै रोजी त्याला अटक केली होती. एजन्सीने अर्पिता मुखर्जीच्या अटकेपूर्वी तिच्या घरातून सुमारे २१ कोटी रुपये जप्त केले होते. तसेच छापेमारीत अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे.
कारवाईच्या काही मिनिटांनंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी “ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. असे म्हणत पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे चौकशीत आणखी मोठ काही समोर येणार आहे अश्या चर्चांना उधान आले होते. छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातून पार्थ चटर्जी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते.