इगतपुरीत गणेश भक्तांनी साकारला ‘पावनखिंडीचा’ देखावा..!

By Pranita Borse

गणपती बाप्पाचं सर्वत्र जोरदार आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा प्रत्येकाच्या घराघरात विराजमान झाले. प्रत्येकाने आपल्या बाप्पांसाठी सर्वोत्कृष्ट डेकोरेशन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आपल्या घरातील आरास ही सगळ्यात भारी कशी असेल याची सर्वांनीच काळजी घेतली आहे. अशात नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील यादव कुटुंबीयांनी आपल्या गणपती बाप्पांसाठी चक्क पावनखिंडीचा देखावा साकारला आहे. सर्वश्रुत असलेले पावनखिंडीत झालेले युद्ध, त्यात बाजीप्रभूंचे शौर्य, शत्रूंवर हल्ला करण्यासाठी हातात मोठाले दगड घेऊन उभे असलेले मावळे आणि दोन तलवार घेऊन शत्रूंवर तुटून पडणारे बाजीप्रभू हे या देखाव्यात दिसून येत आहेत.

बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी सारेच जण त्याच्या स्वागताची जल्लोषात तयारी करत असतात. यात खासकरुन बाप्पासाठी बसायचं आसन आणि डेकोरेशन यावर अनेक जण काम करतात. काही जण या देखाव्यांमधून सध्याची परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करतात. तर, काही जण डोळ्यांना भावणारं डेकोरेशन करतात. अशाच प्रकारे इगतपुरीतली यादव कुटुंबीयांनी गणेशोत्सवासाठी पावनखिंडीचा देखावा साकारला आहे. हा देखावा शहरात आकर्षणाचा भाग ठरत आहे. विशेष म्हणजे या देखाव्यातील जिवंतपणा सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

पावनखिंड इतिहास

‘पावनखिंड’ या चित्रपटातून आपण या खिंडीला पावनखिंड का म्हटलं जातं याचा इतिहास पाहिला असेल. २ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला. त्यामुळे सिध्दी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्याला ठार केले. तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.

राजं तुम्ही पुढं व्हा“, शर्थीने खिंड लढवली

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्दीने सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले. अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत. तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.

महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले. तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली. याच पावनखिंडीच्या युद्धाला आधी पावनखिंड या चित्रपटातून तर आता इगतपुरीतील यादव कुटुंबांनी गणपती बाप्पांच्या देखाव्यातून जिवंत केलं आहे.