‘पगार द्या किंवा राजीनामे घ्या’ सिटीलिंक कर्मचारी आक्रमक

नाशिक : शहरात पुन्हा शहर बस वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी आंदोलन (Citylink bus workers protest) सुरू केलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पगार न दिल्याने कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पगार द्या किंवा राजीनामे घ्या, अशी आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीये. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र फटका बसतोय. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते आहे.

यापूर्वी देखील पगार न देणे, बोनस न देणे यावरून या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होतं. त्यावेळी आश्वासना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मात्र आश्वासन देऊनही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही. आम्हा सर्वांची फसवणूक केली गेली, असे आरोप करत सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला आहे.

‘आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही याआधीही कामबंद आंदोलन केलं होतं. मात्र त्यावेळी आम्हाला तोंडी आश्वासनानुसार आंदोलन मागे घ्यावं लागलं. आश्वासन देऊनही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही. आम्हा सर्वांची फसवणूक केली गेली आणि गेल्या दोन महिन्यापासून पगार त्यासोबतच दिवाळीचा बोनस देखील मिळालेला नाही. त्यामुळे आता जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य केल्याचे लेखी स्वरूपात मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन आहोत. कायदेशीर रित्या पत्र देऊन काम बंद आंदोलन पुकारत आहोत.असे पत्र लिहीत सिटीलींक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

सिटी लिंक बसच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या २ महिन्यांपासून पगार न झाल्याने चालक वाहकांनी आक्रमक हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आधीही ३ महिन्यांचा पगार रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानुसार वेळेवर पगार देण्याची चालक वाहकांची मागणी होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मार्ग काढणार अशा आश्वासनानंतर आंदोलन आता मागे घेण्यात आले होते. त्यावेळी ऐन गणेशोत्सवात सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याने नाशिककरांची चांगलीच गैरसोय झाली होती. बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थी आणि नाशिककरांचे हाल झाले होते. अचानक सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. दरम्यान आता देखील तशीच परिस्थिती उद्भवली आहे. शहरातील ही परिस्थिती पाहता मोठा पेच निर्माण झाला असून यावर आता सिटीलींक प्रशासनाची काय भूमिका असेल याकडे लक्ष लागून आहे.