विदेशात नाशिकरांची कामगिरी; १९ जणांनी पटकावला ‘आयर्नमॅन’ किताब

कझाकस्तान येथे पार पडलेल्या ‘आयर्नमॅन’ हा विशेष किताब १९ नाशिककरांनी पटकावला आहे. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमध्ये प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले यांनी सलग तीन वेळेस आयर्नमॅन स्पर्धा जिंकत हॅटट्रिक साधली. ३.८ किमी स्वीमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

स्वीमिंग, सायकलिंग आणि धावणे, तेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही खडतर स्पर्धा असते आणि तसेच जगभरात अनेक ठिकाणी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा आयोजित केली जाते. त्यात कझाकस्तानात आयोजित करण्यात आलेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेसाठी नाशिकमधील १९ जणांनी सहभाग घेतला होता. एक दोन नव्हे तर सर्वच स्पर्धकांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत विक्रमच साधला आहे. विशेषत: नाशिकच्या तीन खेळाडूंनी हा आयर्नमॅन किताब पटकावतानाच, या किताबाची हॅटट्रिकच साधली आहे. यापूर्वी प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले या खेळाडूंनी दोन आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.

तसेच या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस अश्‍विनी देवरे यांचाही समावेश असून, बहुधा त्या महाराष्ट्र पोलिस दलातील आयर्नमॅन किताब पटकाविणाऱ्या पहिल्याच महिला पोलिस कर्मचारी असतील.

हे आहेत ते १९ नाशिकर ज्यांनी रोवला मनाचा तुरा

‘आयर्नमॅन ’डॉ. वैभव पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. दुष्यंत चोरडिया, डॉ. देविका पाटील, डॉ. अरुण गचाळे, किशोर काळे, माणिक निकम, अनिकेत झंवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे, नीलेश झंवर, नीता नारंग, आविष्कार गचाळे, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरिया, किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार.पितापुत्रांचे कौतुकनाशिकचे डॉ. अरुण गचाळे यांनी त्यांच्या १७ वर्षीय मुलगा आविष्कार समवेतच या स्पर्धेत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या दोघांनी स्पर्धेत साहसी कामगिरी करीत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. आयर्नमॅनसारखी खडतर स्पर्धा पूर्ण करणारे हे पहिलेच पितापुत्र ठरले आहेत.