By चैतन्य गायकवाड |
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे बंडखोर आमदार हे सुरतमधील एका हॉटेल मध्ये थांबल्याची माहिती आहे. त्यानंतर या सर्व आमदारांना सुरतवरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्याबरोबर जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. या आमदारांसोबत काही अपक्ष आमदार देखील असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे हे सध्या या आमदारांसोबत आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती हाती येत आहे.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट आलं आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड फुकारले आहे. त्यांच्यासोबत सेनेचे तसेच काही अपक्ष आमदार देखील आहेत. दरम्यान, या एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदारांचे फोटो व्हायरल झाले आहे. सामाजिक माध्यमांवर हे फोटो व्हायरल झाले आहे.