राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच असून पुन्हा एकदा भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते औरंगाबाद दौऱ्यावर असून, आज त्यांनी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, ‘ शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता?’ असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य
आज सकाळी त्यांनी पैठणच्या संत पीठातील कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगल्या कामासाठी पैसे देत आहेत. मात्र सरकारवर अवलंबून का राहत आहे. या देशामध्ये शाळा कोणी सुरु केल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केल्या.”
“यावेळी त्यांना शाळा सुरु करतांना सरकराने अनुदान नाही दिले. शाळा चालवत आहे, मला पैसे द्या म्हणून त्यावेळी त्यांनी लोकांकडे भिक मागितली. त्या काळात दहा-दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी देणारे आहेत. त्यामुळे कंपन्यांनी सामाजिक कामासाठी दोन टक्के पैसे खर्च करणे गरजेचे आहे. मंदिर आपण उभं करतो, तेव्हा सरकारकडे थोडी पैसे मागतो”
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून त्याच्यावर टीका होत आहे. अमोल मिटकरी म्हणाले, ‘भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागितली होती. तशी महामानवांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली नाही. लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यांनी शाळा सुरू केल्या’, असा हल्लाबोल त्यांनी चंद्रकांत पाटलांवर केला.
भाजप नेत्यांच्या मस्तकातील घाण काढण्यासाठी गाडगे बाबांचा झाडू हाती घ्यावा लागेल, असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी दिला.
खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून निषेध केला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या सर्वच महापुरुषांचा अवमान कुणीही करु नये म्हणूनच काल मी संसदेत महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं धारिष्ट कोणी करणार नाही.”