नाशकातील बाप-बेट्यांची आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई!

नाशिक : शहरातील पिता-पुत्रांची सामुहिक आत्महत्या प्रकरणात तब्बल 21 सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. २९) शहरातील सातपूर भागातील राधाकृष्णनगर येथे एका पित्याने आपल्या दोन तरुण मुलांसह खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली होती.

खासगी सावकारांकडून पैश्यांच्या तगाद्यामुळे या पिता-पुत्रांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यानुसार सातपूर पोलिसांनी याप्रकरणी 21 सावकारांविरोधात गुन्हा केला असून त्यांना ताब्यात घेण्याचे सपाटा लावला आहे. आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथील दीपक शिरोडे (वय. ५५) आणि त्यांचे दोन मुले प्रसाद शिरोडे (वय. २५) आणि राकेश शिरोडे (वय. २३) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. यांचा अशोकनगर भाजी मार्केट येथे फळविक्रीचा व्यवसाय होता. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तपास केला असता पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळून आली होती. त्यानुसार खासगी सावकारांकडून त्यांच्या पैश्यांसाठी सतत ताडगा लावला जात होता. या तगाद्याला कंटाळून या बाप-लेकांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

याप्रकरणी आता पोलिसांनी 21 सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दहा जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.