नाशिक : कर्नाटक (Karnataka) येथील किष्किंधा (Kishkindha) मठाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या शोभायात्रेला नाशिक पोलिसांनी (Nashik police) परवानगी नाकारली आहे. नाशिक शहरात कलम १४४ लागू (जमावबंदी आदेश) केलेला असल्याने, ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
हनुमानाचे जन्मस्थळ हे अंजनेरी (Anjaneri) नसून कर्नाटकातील किष्किंधा हे असल्याचा दावा किष्किंधा येथील मठाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी केला असून या विषयावरून चांगलाच वाद चिघळला आहे. त्यांनी नाशिकच्या साधू-महंतांना अंजनेरी हे हनुमाचे जन्मस्थान (birth place) असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान केले होते. आज नाशिकमधील हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी गावच्या ग्रामस्थांनी आणि साधू महंतांनी स्वामी गोविंदानंद महाराज यांनी केलेल्या हनुमान जन्मस्थळाच्या दाव्याला विरोध केला. साधू-महंत आणि नागरिकांनी अनोदालन करत ‘रास्ता रोको’ देखील केला होता.
दरम्यान, स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी नाशिक (Nashik) मध्ये शोभायात्रा काढण्याचे ठरवले होते. मात्र, नाशिक शहरात कलम १४४ लागू असल्याने, या आदेशानुसार सार्वजिक ठिकाणी (public place) कुठल्याही प्रकारचे मोर्चा, आंदोलन, निदर्शने, सभा, यात्रा काढण्यास मनाई आहे. त्यामुळे पोलिसांनी या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे. एकीकडे नाशिकमध्ये स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या शोभायात्रेला जरी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, मात्र उद्या सकाळी ठरलेली शास्त्रार्थ सभा ही संपन्न होणार आहे. ही शास्त्रार्थ सभा महर्षी पंचायतन पीठ येथे होणार आहे. त्यामुळे उद्याच्या शास्त्रार्थ सभेत काय निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे…