नाशिक । प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या भागापैकी खिर्डी-सागपाडा-खोबळा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहुतकीसाठी नाहीच नाही परंतु या रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले आहे.
निसर्ग सौंदर्याने बहरलेला सुरगाणा तालुका आजी पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याचे या उदाहरणावरून लक्षात येते. तालुक्यातील खिर्डी-सागपाडा-खोबळा अतिदुर्गम भाग असून या भागाची येजा तालुक्याला होत असते. मात्र रस्त्याची अशी अवस्था झाल्याने बस तर नाहीच नाही परंतु खाजगी वाहने देखील या रस्त्याने जाणे टाळतात. परिणामी या परिसरातील नागरिकांना पायपीट करावी लागते.
सुरगाणा तालुक्यात पासून जवळपास ४० ते ४५ किमी अंतरावर ही वडपाडा, सागपाडा, खोबळा दी, कहांडोळपाडा, वांगनपाडा आणि खीरपाडा ही गावे असून शेजारी गुजरात राज्याचे हद्द सुरू होते. त्या भागातील रस्ते अगदी चांगले आहेत. मात्र इकडची परिस्थिती त्याउलट असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मागील पंधरा वीस वर्षात एकदाच सदर रस्ता झाला असून अद्यापपर्यंत त्यावर साधा डांबर सुद्धा मारला नसून मोटर सायकल चालकांना मोठी कसरत करावी लागते.
येथील योगीराज गवळी सांगतात कि पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. या परिसरात येणे जाणेच बंद होते. अशावेळी रुग्णांना दवाखान्यात नेतेवेळी त्रासाला सामोरे ज्वेल लागते. त्यामुळे या मार्गावर लवकरात लवकर रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी योगेश जांजर, हिरामण चौधरी, विलास चौधरी, रमण गोभाले, सुदाम जांजर, रमण जाधव, भास्कर चव्हाण, अलकेश भुसारे आदी ग्रामस्थांनी केली आहे.