By Pranita Borse
नाशिक: राज्यात अनेक भागात पावसाची धुवाधार फायरिंग झाली खरी, तरी अजूनही काही भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातही (Nashik district) पावसाची प्रतीक्षा कायम असून नाशिककरांवर पाणी कपातीचं सावट आहे. अशात पाणीकपातीचा निर्णय सोमवारी म्हणजेच येत्या ११ तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाने जुलैमध्ये काही भागांना धु-धु धुतलं. कोकणासह मुंबई त्याबरोबरच धुळे, जळगाव, पालघर, इत्यादी जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईत (Mumbai) सोमवारपासून (४ जुलै) मुसळधार पाऊस सुरु आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने लोकलच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील (Kolhapur) पंचगंगा नदीची (Panchaganga River) पातळी वाढत आहे. तर, इतर नद्याही ओसंडून वाहत आहेत. नाशकात मात्र अद्यापही पावसाने दांडी मारली आहे. नाशिक जिल्ह्यात १५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर पेरण्या देखील झाल्या आहे. मात्र अजुनही समाधानकारक पाऊस पडला नाही. पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाची शक्यता नाकारता येत नाही.
जून महिना उलटून गेला आहे, तरी नाशिक जिल्ह्यात पाऊस दडी मारून बसला आहे. धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने नाशिककरांवर पाणीकपातीची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसल्यामुळे जिल्ह्यातील धरण समूहात पाण्याने तळ गाठला आहे. सध्याच्या परिस्थितीत फक्त २५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील धरण समूहात किती टक्के पाणी शिल्लक
गंगापूर खोरे धरण समूह
गंगापूर २६ %
कश्यपी १६ %
ओझरखेड २६ %
दारणा २८ %
मुकणे ३६ %
कडवा १३%
गिरणा खोरे धरण समूह
चणकापूर २०%
गिरणा ३४ % इतका पाणीसाठा नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोरे आणि गिरणा खोरे धरण समूहातील मोठ्या आकाराच्या धरणांत शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना समाधानकारक पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.