छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात असून यामुळे राज्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावत आहेत. राज्यातील वातावरण काही दिवसांपासून तापलेले असून भाजप विरोधात रोष वाढत आहे. त्यात प्रसाद लाड यांचे वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली न तोच पुन्हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा केलेला एकेरी उल्लेखाने महाराष्ट्र पेटून उठला. यावर विरोधकांनी आगडोंब उठवली असून सत्ताधारी कैचीत सापडले आहेत. यात आता सत्ताधारी पक्षातील आमदाराने महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा तिखट भाषेत समाचार घेतला असून याची राज्यभर चर्चा आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानानावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन्ही भाजप नेत्यांचा तिखट समाचार घेतला असून ते म्हणाले, या प्रसाद लाडांचा जन्म पाकिस्तानात झाला वाटते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही, अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याची व चिखलफेक करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत असताना दुसरीकडे हे वाचाळवीर पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर कडक शब्दांत टीका
आमदार गायकवाड यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांचा देखील समाचार घेतला असून ते म्हणाले, “रावसाहेब दानवे हा छत्रपतींना शिवाजी म्हणतो. त्यांच्या बापाला ते नाव घेऊन हाक मारतात का? असा सवाल त्यांनी विचारला. आमचा सगळ्यांचे बाप आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज मग त्यांना एकेरी भाषेत बोलता. माझी विनंती आहे की भाजपच्या फडणवीस साहेबांनी व नेतृत्वाने या वाचाळवीरांना आवरावे.”
“महाराष्ट्र हा शिवरायांचा अपमान कधीही सहन करत नाही. ठीक आहे की आम्ही मित्र पक्षासोबत आहोत. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून आम्ही गप्प आहोत. मात्र यापुढे शिवरायांचा अपमान सहन करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.