संसदेतील नव्या अशोक स्तंभामुळे पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण

संसद भवनाच्या छतावर स्थापित नव्या अशोक स्तंभ या राष्ट्रीय प्रतिकाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी केले आहे. नव्या संसदेतील या अशोक स्तंभाची उंची २० फूट तर या अशोक स्तंभाचं वजन ९ हजार ५०० किलो आहे. या दिमाखदार अशोकस्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र या नव्या अशोक स्तंभामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.

एका महाकाय अशा अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मात्र त्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला. नव्या अशोक स्तंभावर अनेक जणांनी आक्षेप घेतले. काहींनी नव्या अशोक स्तंभावर असलेले सिंह हे पूर्वीच्या स्तंभावरील सिंहांपेक्षा आक्रमक आणि लढण्याच्या पवित्र्यात आहेत असं दाखवण्यात आले असल्याचं म्हटले तर काही ठिकाणी मोदींनी मनाप्रमाणे नवीन अशोक स्तंभ घडवल्याचे आरोप केले. असदुद्दीन ओवेसी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप या पक्षांनीही नव्या अशोक स्तंभावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी तर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची राजमुद्रा बदलल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर भारताची राजमुद्रा बदलणाऱ्यांना राष्ट्रविरोधी का म्हटलं जाऊ नये? का असा प्रश्न विचारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या राजमुद्रेचा अपमान केला आहे. नव्या संसदेत बसवण्यात आलेला अशोक स्तंभ हे अशोक स्तंभाचं मोदींचं व्हर्जन आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण सोडले.

विरोधी पक्षचं नव्हे तर नेटकऱ्यांनी देखील नवीन अशोक स्तंभावर आक्षेप घेतले आहे. नव्या अशोक स्तंभावर असलेले सिंह हे खुनशी दिसत आहेत असा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. काही नेटकऱ्यांनी जुन्या आणि नव्या अशोक स्तंभाचा फोटो सोबत ट्विट केले आहे आणि दोन्हीची तुलना बरोबर नाही असं म्हटलं आहे. जुन्या अशोक स्तंभाच्या तुलनेत नवा अशोक स्तंभ आक्रमक आहे अशी प्रतिक्रिया देखील समाज माध्यमांवर उमटली आहे.