सुरगाणा : सापुतारा फेस्टिवल मध्ये आदिवासी लोक कला पथकांचा डंका राहिला. तातापाणी भोवाडा कला पथके ठरले पर्यटकांचे आकर्षण.परदेशी पाहुण्यांची पावले थिरकली आदिवासी कलेच्या तालावर. आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन गुजरात राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री पुरणेशभाई मोदी यांनी सापुतारा फेस्टिवलचे आयोजन निमित्ताने केले.
सुरगाणा शहरापासून अवघ्या वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील गुजरात राज्यातील सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात सापुतारा फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन केले जाते. डांग, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी लोककला, संस्कृती, परंपरा याचे प्रदर्शन या निमित्ताने गुजरात पर्यटन महामंडळाच्या वतीने केले जाते.आदिवासींची लोककला, पौराणिक संस्कृती, प्रकृती संवर्धन व जतन या गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. ह्या फेस्टिवलचे महिनाभर आयोजन केले जाते.
पिंपळसोंड येथील कणसरा माता भोवाडा कलापथक, डोल्हारे येथील भगवान बिरसा मुंडा कलापथक, श्री भुवन चिंचपाडा येथील मादोळ कलापथक या कला पथकांना गुजरात टुरिझम तर्फे पर्यटकांचे मनोरंजन, करमणूक करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. या नृत्य रॅली मध्ये आदिवासी संस्कृतीची भुरळ पडल्याने परदेशी पर्यटक युगांडा, केनिया,झांबिया,मलावी,कजाकिस्तान,युक्रेन, नायजेरिया, कोंगो या परदेशी पाहुण्यांनी भोवाडा नृत्य आदिवासी काळ्या वाजंत्री वर ठेका धरत नृत्य केले. सापुतारा मध्ये” मेघ मल्हार पर्वाचे आयोजन उत्साह झाले. एक महिना सुरु असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोरंजनाचे कार्यक्रम महिनाभर आयोजित केले जातात.या साठी महाराष्ट्र सिमेवरील कला पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.