औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत संबंधित ठिकाणी हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या केल्या जातात.