राज ठाकरेंची फटकेबाजी! राज्यपाल कोश्यारी, कोकणातील रिफायनरीवर भूमिका

रत्नागिरी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्यामुळे झालेला वाद अजूनही शमला नसून त्यांच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस अधिक तीव्र आंदोलन केले जात आहे. त्यात आता राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लक्ष केले असून त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. राज्यपालांना कोणी काही सांगतं की काय असं वाटतं. माणसाला पत येते, पण पोच येत नाही. त्यांना ती पोच नाहीच असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत (Regarding refinery projects) देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर (On the Ratnagiri tour) असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

भगतसिंग कोश्यारी यांच्यावर खरमरीत टीका

राज ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा समाचार घेतला असून राज म्हणाले, ” राज्यपालांना कोणी काही सांगतं की काय असं वाटतं. वाद उकरून काढायचे आणि सर्व फोकस दुसरीकडे वळवायचा असं काही सुरू आहे का असं वाटतं. या मागे व्यूव्हरचना सुरू आहे का? अशी शंकाही येते. माणसाला पत येते, पण पोच येत नाही. त्यांना ती पोच नाहीच,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

पुढे बोलताना म्हणाले, शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. फक्त वाद सुरू ठेवा. महाराजांनी जे सांगितलं जे घडवलं ते काही घेऊ नका. फक्त वाद करा. करत बसा म्हणावं. आपलं अपयश झाकण्यासाठी यासर्व गोष्टी काढल्या जातात. अनेक विषय काढले जातात. इतर विषयांवरचं लक्ष डायव्हर्ट होतं. त्यासाठीच हे सुरू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

रिफायनरी प्रकल्पांबाबत बोलताना म्हणाले,

“विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको अशी भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. मात्र, राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट म्हटले.