महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उद्या वांद्रे पूर्व येथील रागशारदा सभागृहात आयोजित केलेली सभा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या (दि.१३) म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी सभा घेणार होते. मात्र, राज्यात पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने ही सभा तूर्तास रद्द करण्यात आली आहे.
राज्यात हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. मागील ४ दिवसांपासून दिवस-रात्र पावसाची धुवाधार फायरिंग सुरूच आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राज ठाकरे यांनी उद्या वांद्रे पूर्व येथील रागशारदा सभागृहात बोलवलेली पक्षाची बैठक काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. सभेची पुढची तारीख पाऊसाचा अंदाज लक्षात घेऊन लवकरच कळवण्यात येईल असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील सद्यस्थिती पाहता आणीबाणीची स्थितीही निर्माण होऊ शकते. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार कायम असून धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे धरणसाठ्यांतून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नदी काठच्या लोकांचे स्थलांतर त्यांची तात्पुरती निवासस्थान आणि अन्यधान्याची सोय करावी लागू शकते. अश्यात नागरिकांची सर्वोतोपरी काळजी घ्यावी अश्या सूचनाही राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
सत्ता परिवर्तनानंतर प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ जुलै रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लागले होते. राज यांनी वांद्रे पूर्व येथील रागशारदा सभागृहात पक्षाची बैठक बोलावली होती. बैठकीत मुंबईतील सर्वपक्षीय नेते, सरचिटणीस आ. उपाध्यक्ष व विभागप्रमुख उपस्थित राहणार होते. सभापती निवडीच्या वेळी आणि शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मनसेच्या एकमेव आमदाराने सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला. यावरून मनसे शिंदे सरकारसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत युतीबाबत मनसेची भूमिका राज ठाकरे यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेला धक्का बसल्यानंतर भाजपने मनसेसोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोन्ही पक्षांमधील युतीची चर्चा पुढे सरकू शकली नाही. अशात आता पुढील पक्षाच्या बैठकीत राज ठाकरे कोणती भूमिका घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.