रामदास आठवले म्हणतात,”मोदींनी आणलेले चित्ते पाहायला जाणार अन् एक चित्ता घेऊन येणार”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांना नामिबियावरुन आणण्यात आले आहे. हे एकूण ८ चित्ते असून ते बघण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जाणार असून तिथून एक चित्ता देखील घेऊन येणार आहेत. रामदास आठवले सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ही माहिती दिली आहे. त्यामुळे रामदास आठवले यांचे हे वक्तव्य चर्चेत आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


मिळाले तर तिथून एक चित्ता घेऊन येणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांना नामिबियावरुन आणण्यात आले. तेव्हापासून हे चित्ते सतत चर्चेत आहेत. त्यांचावरून राजकारण देखील झाले. मात्र आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर भाष्य केले असून ते म्हणाले, “भारतात आणलेले चित्ते आम्ही अजून पाहिलेले नाहीत. पण नॅशनल पार्कमधल्या एका चित्त्याला आम्ही दत्तक घेतले आहे. पंतप्रधान मोदींनी आणलेले चित्ते मी पाहायला जाणार आहे. आणि मिळाले तर तिथून एक चित्ता घेऊन येणार आहे”.

भारत जोडो नाही भारत तोडो

केंद्रीय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर देखील भाष्य केले आहे ते म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे. काँग्रेसने त्यांचा पक्ष मजबूत करायला हवा. नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे बच्चों का खेल नही हैं, अशा शब्दांत आठवलेंनी राहुल गांधींना सुनावले आहे. रामदास आठवले त्यांच्या वक्तव्यांनी नेहेमी चर्चेत असतात.