रामदास कदम यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर त्यांची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत चालू होती, दरम्यान शिवसेनेबद्दल खदखद व्यक्त करताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले आहेत. रामदास कदम यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र “हकालपट्टी करण्याचा अगोदर मीच तुम्हाला माझ्या मनातून काढले, अन माझा राजीनामा तुमच्याकडे पाठवला” असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. माझी हकापट्टी करण्याआधी मी स्वतः राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असं सांगत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जाहीर टीकास्त्र केले आहे.
मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला आहे. आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केली. उद्धव ठाकरे अशी किती लोकांची हकालपट्टी करणार आहात? ५० आमदारांची हकालपट्टी केली आहे, आता १२ खासदार तुम्हाला सोडून जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत त्यांची हकालपट्टी करणार आहात. मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक तुम्हाला सोडून चाललेत ते का? याच आत्मपरीक्षण करा त्याची जास्त गरज आहे असा सल्लाही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
“मी गेल्या ५२ वर्षांपासून शिवसेनेसाठी संघर्ष करत आहे. अनेक दंगलींमध्ये बाळासाहेबांच्या सांगण्यावरून गेलो आहे . बाळासाहेबांनी सांगितले होते धुळ्याला जा म्हणून त्या भयंकर दंगलीत तर मी मेलो असतो, आज तुम्हाला मी इथे दिसलो देखील नसतो. आणि मी जे रात्रंदिवस शिवसेनेसाठी काम केले ते तमाम शिवसैनिक साक्षीदार आहेत. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे फुटले तेव्हा मीच संघर्ष केला. नारायण राणे गेले तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या सीटवर मी बसलेलो असायचो याची आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढलं आणि आधी राजीनामा फेकला,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
शरद पवारांनी शिवसेना फोडली असे म्हणत शरद पवारांवर देखील रामदास कदमांनी टीकास्त्र डागल आहे. ते म्हणाले “शरद पवार अखेर शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, त्यांचा डाव यशस्वी झाला. शरद पवारांना बाळासाहेब असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केलं,” असंही ते म्हणाले. अडीच वर्षात हे घडलं म्हणून नशीब, अन्यथा पाच वर्षात संपूर्ण शिवसेना संपली असती.
‘हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात एकत्र कसा येता येईल यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करावे, आता मी उद्या पासून एकनाथ शिंदे सोबत जाणार आहे सभा बैठका घेणार आहे. पण कोणालाही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंवर बोलू देणार नाही, टीका करू देणार नाही, नाहीतर शरद पवारांचा डाव साध्य होईल असेही रामदास कदम म्हणाले.