राऊतांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार, डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू: गिरीश महाजन

संजय राऊतांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला आहे. असा घणाघात मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. काल सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावर संजय राऊत यांनी भाजपला डिवचले होते. आता त्याचे प्रतिउत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

केंद्रात 8 वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हे दोन्ही प्रबळ आणि शक्तीमान नेते आहेत. तरीही ‘धर्मांतरण’ आणि ‘लव्ह जिहाद’सारखे विषय घडत असतील, तर हे त्या सरकारचं अपयश आहे. काश्मीरमध्ये अजूनही पंडितांना रस्त्यावर यावे लागत आहे. हिंदुना आक्रोश करावा लागतोय हे दुर्दैव असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर भाजपने मोर्चे काढले नाहीत? असा सवाल देखील संजय राऊत यांनी भाजपला केला होता.

गिरीश महाजनांचे संजय राऊतांना सडेतोड

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर गिरीश महाजनांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, “संजय राऊतांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला आहे. राहुल गांधींबरोबर ते काश्मीरमध्ये फिरत आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे. त्यांना हिंदू शब्दाची सुद्धा अ‍ॅलर्जी झाली आहे. या नैराश्यातून अशी वक्तव्य करण्यात येत आहे”, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

“संजय राऊत हिंदूत्वाबरोबर फारकत घेऊन गळ्यात गळे घालून कोणसोबत फिरतायत हे सर्वांना दिसत आहे. वेळ प्रसंगी एमआयएमबरोबर सुद्धा ते जाऊन बसले आहेत. त्यांच्याकडे आमदार, खासदार आणि शिवसैनिकही राहिले नाहीत. ते सगळे एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले असून, नैश्यातून पाहिजे ते बोलत आहेत.”