रविंद्र जाडेजा धर्मसंकटात! बायको भाजप उमेदवार तर बहिण काँग्रेसकडून…

गुजरातमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून यामुळे भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा हा धर्मसंकटात सापडला आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून या यादीत रविंद्र जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला उमेदवारी घोषित केली आहे. मात्र यात ट्वीस्ट असा की रीवाबा यांच्यासमोर त्यांची सख्ख्यी नणंद नैना जाडेजाचे आव्हान आहे, ज्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक अनेक अंगांनी चुरशीची ठरणार आहे.

टीम इंडिया पराभवाच्या छायेत असताना किंवा कठीण परिस्थितीतल्या सामन्यात रविंद्र जाडेजाने कमालीची कामगिरी बजावून अनेकदा भारताला जिंकून दिले. मात्र आता बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा? आता या राजकीय गुगलीवर जाडेजा षटकार मारणार की आऊट होणार. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविंद्र जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला उमेदवारी घोषित केली आहे. रीवाबा 2019 पासून भाजपचे काम करत आहेत. जामनगरच्या विकासासाठी त्यांच्याकडे अनेक प्लॅन्स आहेत. मात्र आमदार व्हायच्या या स्पर्धेत त्यांना त्यांच्याच नणंदेच तगड आव्हान आहे. रविंद्र जाडेजाची सख्खी बहिण नैना जाडेजा या गुजरात महिला काँग्रेसच्या महामंत्री आणि जामनगरच्या स्टार प्रचारक आहेत. जिथे नैना यांच्या वहिनी म्हणजेच रीवाबा जाडेजा भाजपच्या उमेदवार आहेत. तिथेच नैना जाडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करतायेत.

गुजरात विधानसभा रणधुमाळीत जाडेजाच्या देखील घरात रणधुमाळी लागल्याचे पाहायला मिळते. जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे निवडणूक निकालांत स्पष्ट होईलच की कोण कोणावर भारी पडणार आहे.