शिवसेनेत बंड आणि ‘सामना’ च्या मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्राच्या मुख्य संपादक पदाची धुरा उध्दव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याच्या आधी सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक पद हे रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवले होते. राज्यातले राजकारणाचे समीकरण बदलून किमान समान या कार्यक्रमावर आधारित महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्यातच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे ठरवण्यात आले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे हे सामनाच्या संपादकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते.

त्यामुळं काही महिने हे पद रिक्त होते. संपूर्ण जबाबदारी ही संजय राऊत यांच्याकडे होती. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक पद देण्यात आले. पूर्वी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते. ‘सामना’ म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ‘सामना’ असंच समीकरण गेली अनेक वर्षे पाहायला मिळाले.

देशातील महत्वाच्या मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखातून कोणती ‘रोखठोक’ भूमिका मांडली आहे, याकडे देशभरातील माध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. भाजपसोबत सत्तेत असतानाही भाजपवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे टीकेची झोड उठवत होते. मात्र आता राज्यात पुन्हा भाजपचा एक नंबर चा विरोधक शिवसेनाच असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मुख्य संपादक पदाची जबाबदारी स्वीकारली असल्याने ते भाजपसहित इतर राजकीय घडामोडींवर काय बाण सोडतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे देखील ईडीने अटक केली आहे.