‘राज्यपालांना हटवा’ नाशिकमधून राष्ट्रपतींना ५ हजार पत्र

नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर शिवप्रेमी अजूनही भडकले असून त्यांना या पदावरून हटवण्यास शहरात शिवजन्मोत्सव समितीकडून (From Nashik Shivjanmotsav Committee) एक वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे, या मागणीसाठी शिवजन्मोत्सव समिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पाच हजार पोस्ट कार्ड पाठवले आहेत. राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करीत काळा मंडप टाकून तसेच पदाधिकाऱ्यांनी हातावर काळे रिबीन बांधून राज्यपालांचा निषेधही केला. तसेच जिल्हातील गावागावत जाऊन पत्र गोळाकरून राष्ट्रपतींना पाठवणार असल्याची माहिती शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष राजेश कोकणे यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्या विरोधात अजूनही राज्यभर ठीक-ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. त्यांची राज्यपाल पदावरून उचलबांगडी व्हावी अशी तमाम शिवप्रेमींची मागणी आहे. अश्यातच आता नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यासाठी वेगळाच उपक्रम राबवला असून थेट महामहीम राष्ट्रपती द्रौपती मृर्मू यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

समितीचे माजी अध्यक्ष राजेश कोकणे यांनी माहिती दिली की, जागोजागी राज्यपाल यांना महाराष्ट्रातून हटवावे याची मागणी होत आहे. मात्र, यावर केंद्र सरकार (Central Govt) कोणताही तात्काळ निर्णय घेत नसल्याने शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्या विरोधात पत्र लिहून ती राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात गुरुवारी नाशिक रोड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून पाच हजार पोस्ट कार्ड टपाल खात्यात देण्यात आली.

दोन दिवसानंतर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जिल्ह्यातील गावागावात ही पत्रे देऊन त्यावर नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात येणार असून विविध गावांमधून ही पोस्ट कार्ड राष्ट्रपतींना देण्यात येणार असून याची संख्या ही 11, 000 होणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.